प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. म्हणजेच सामान्यपणे वर्षाला २४ असलेल्या एकादशी अधिक मासाच्या वर्षात २६ होतात. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात.
सणामागची पौराणिक कथा ‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून ‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे त्यांना तीन दिवस झाले तरी बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले.
म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात –
काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते.
आषाढी एकादशीची पूजाविधी –
विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनाला रीघ लागते. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावं. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो.
रात्री हरिभजन करत जागरण करावं. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लाववा.