भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये बैलांचे योगदान हे बहुमूल्य आहे. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा हा सण त्यापैकीच एक आहे, या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात राज्यात साजरा केला जातो. बैलाबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण म्हणजे पोळा. सर्वसामान्यतः श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.या दिवशी बैलांना सजवून-रंगवून त्यांची पूजा करतात. त्यांना आरती ओवाळतात व पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवितात. गावातील सर्व बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.घराल बैल नसतील, तर मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी शेतकरी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाही.बैलांना दैवत मानून त्यांची वर्षातून एक दिवस पूजा करून शेतकरी बैलांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल पूज्यभाव व्यक्त करतो.
या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. पशुपूजेच्या ह्या प्रकाराचे मूळ मानवाने ज्या काळात पशुपालनास आरंभ केला, त्या प्राचीन अवस्थेत असणे शक्य आहे
पोळा सण कसा साजरा करतात –
महाराष्ट्रात पोळा सण उत्साहात साजरा करतात. त्यादिवशी बैलास सजवतात व त्यांची पूजा करतात.
बैलास हळद, बेसन पेस्ट लावून, तेलाने मालिश केली जाते. यानंतर त्यांना गरम पाण्याने चांगले आंघोळ घातली जाते.यानंतर बैलांना चांगले सजवले जाते.त्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान करतात, विविध प्रकारचे दागिने, हार घालतात. शाल चढवली जाते.
गावातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात, आणि सजवलेले बैल आणतात. या दिवशी प्रत्येकाला आपले बैल पाहण्याची संधी मिळते.
बैल पोळा अख्यायिका –
कैलासमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाली परंतु भगवान शंकर मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नंदीला माता पार्वतीने विचारले कि या खेळामध्ये कोण जिंकले. तेव्हा नंदीने भगवान शंकराचे नाव घेतले. त्यावर मा पार्वती क्रोधीत झाल्या आणि नंदीला शाप दिला की, पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील. तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली. त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल.तेव्हापासून Bail Pola सण साजरा होतो.