You are currently viewing सत्यनारायण कथा Satyanarayan Katha

सत्यनारायण कथा Satyanarayan Katha

श्रीगजाननाय नम: आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणार्‍या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार्‍या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” ॥२॥ सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत (भारतात) आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दु:खे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दु:के नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला.” ॥७॥

नारद म्हणाले, “ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दु:खे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो.” ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णु नारदाजवळ बोलले. भगवानम्हणाले, “मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मीत्याचे समर्पक उत्तर देईन.” ॥१०॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दु:खे भॊगीत आहेत.” ॥११॥ नारद म्हणाले, “हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दु:खी लोकांची सर्व दु:खे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऎकण्यची इच्छा आहे.”॥१२॥ भगवान्म्हणतात, “हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दु:खे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥

या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. ॥१५॥ भगवान्‌ विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, “हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ॥१६॥ ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा.” हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. ॥१७॥ तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे. ॥१८॥ ॥१९॥ केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद (सव्वा पावशेरे, सव्वा अच्छेर, सव्वा शेर इत्यादी प्रमाणे करून) भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२०॥ गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. ॥२१॥

आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऎकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बांधव सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजानादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरि देवघरात पवित्र ठिकाणि करावे. ॥२३॥ पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:खनाशाचा हाच एक सोप उपाय आहे.” ॥२४॥ सत्यनारायणकथेतीय प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. ॥१॥ हरये नम: ।

॥प्रथमोध्याय: समाप्त: ॥

भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. ऎक, सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहात होता. (अध्याय २ श्लोक १) भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दु:खी ब्राह्मणाला पाहून ॥२॥ भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, “हे ब्राह्मणा, तू दु:खी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ॥३॥ ते सर्व ऎकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांग.” हे वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंताचे भाषण ऎकून तो ब्राह्मण म्हणाला. “मी अती दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. ॥४॥ हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा.” असे ब्राह्मणांचे भाषण ऎकून भगवान म्हणाले. “सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. ॥५॥

“जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर.” ॥६॥ त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. ॥७॥ वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही ॥८॥ नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून ‘मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन’ असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. ॥९॥ त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. ॥१०॥ नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दु:खांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. ॥११॥ त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ॥१२॥ ब्राह्मणहो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावने करील त्या वेळी त्याचे सर्व दु:ख नाहीसे होईल. ॥१३॥ मुनिहो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू?” ॥१४॥

ऋषी पुन्हा विचारतात, “त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऎकिले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले, ते सर्व ऎकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे.” ॥१५॥ सूत म्हणतात, “मुनिहो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऎका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. ॥१६॥ ॥१७॥ तो मोळीविक्या तहानेने च्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून ॥१८॥ त्याला नमस्कार केला व विचारले, “महाराज, आपण काय करीत आहात? व हे व्रत केल्याने काय फळ मिळते, ते विस्तारपूर्वक सांगा.” ॥१९॥ ब्राह्मण म्हणाला, “सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे.” ॥२०॥ नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. ॥२१॥ सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळॊ मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्र्व्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व ॥२२॥ २३ ॥

धनिक लोक ज्या नगरात राहात होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. ॥२४॥ नंतर त्याने आनंदी अंत:करणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. ॥२५॥ ॥२६ ॥ या सत्यनारायणव्रताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. ॥२७ ॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पुरा झाला. ॥२॥ हरये नम:

॥अथ द्वितीयोऽध्याय: समाप्त ॥

सूत सांगतात, “ऋषीहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऎका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. ॥१॥ तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान्होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्र्व्य देऊन संतुष्ट करीत असे. ॥२॥ त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. ॥३॥ त्या वेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला, ॥४॥ व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणार्‍या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. ॥५॥ साधुवाणी म्हणाला, “हे राजा, भक्तियुक्त अंत:करणाने हे तू काय करीत आहेस, ते सविस्तर मला सांग. माझी ऎकण्याची इच्छा आहे.” ॥६॥

राजा म्हणाला, “हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे.” ॥७॥ राजाचे हे वाक्य ऎकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला. “महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा; जसे सांगाल तसे मी करीन,. ॥८॥ मला पण संतती नाही. ती या व्रतामुळे नक्की होईल.” असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला, ॥१०॥ व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले, ज्या वेळी मला संतती होईल त्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. ॥१०॥ अशा प्रकारचे व्रत शीलवान्साधु वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंत:करणाने पतीची सेवा करीत असता, सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. ॥११॥ ॥१२॥ नंतर तिला दहावा महिना सुरू होताच एक कन्यारत्‍न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रणाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधु वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला. ॥१३॥ ॥१४॥

“महाराज, पूर्वी केलेले नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही?” असा तिचा प्रश्न ऎकून साधुवाणी म्हणाल. “हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन.” ॥१५॥ अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसर्‍या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. ॥१६॥ साधु वाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठीकांचन नावाच्या नगराला आला. ॥१७॥ ॥१८॥ नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला; त्या वेळी सर्वगुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून ॥१९॥ त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंत:करणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. ॥२०॥ त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान्रागावले. ॥२१॥ नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला. ॥२२॥

आणि सिंधु नदीच्या जवळ असणार्‍या रम्य अशा रत्‍नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान्जावयासह तो साधु वाणी व्यापार करू लागला. ॥२३॥ ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायणप्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणपूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दु:ख प्राप्त होवो असा शाप दिला.॥२४॥ शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसांत चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. ॥२६॥ आपल्यामागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. ॥२७॥ इतक्यात ते राजदूत, सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले, ॥२८॥ व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी.” ॥२९॥ राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. ॥३०॥

त्यावेळी आम्ही चोर नाहीं असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऎकले नाहि; उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले.॥३१॥ सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दु:ख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. ॥३२॥ तेव्हापासून मानसिक दु:ख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दु:खी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. ॥३३॥ साधुवाण्याची मुलगी कलावतीपण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले, ॥३४॥ आणि तेथे बसली व नंतर कथा ऎकून सत्यनारायणप्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. ॥३५॥ त्या वेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, “हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे?” ते ऎकून कलावती म्हणाली, “हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले.” ॥३६॥ ॥३७॥

मूलीचे वाक्य ऎकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली ॥३८ ॥ व त्या पतिव्रता असणार्‍या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले ॥३२॥ व ‘हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात’ अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्या वेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. ॥४०॥ नंतर चंद्रकेतुच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, “हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. ॥४१॥ तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. ॥४२॥ असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन.” असे राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान्अदृश्य झाले. नंतर प्रात:काळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दुतांना आज्ञा केली. ॥४३॥ ॥४४॥ दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्यासमोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले. ॥४५॥

“महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत.” नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतु राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तान्त आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. ॥४६॥ त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतु राजा आदराने म्हणाला, “वैश्यहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दु:ख भोगावे लागले. आता भीती नाही.” असे बोलून त्यांच्या बेड्या काढवून क्षौरकर्म व मंगलस्नान करविले. ॥४७॥ ॥४८॥ नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले ॥४९॥ व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, ‘हे साधो, आपण आपल्या घरी जा.” नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, “आम्ही आपल्या कृपेने घरी जातो.” ॥५०॥ ॥५१॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पुरा झाला. ॥३॥ हरये नम: ॥

॥इति तृतीयोध्याय: समाप्त: ॥

नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांस दक्षिणा देऊन आशिर्वाद घेतला व जावयासह स्वत;चे नगरास गेला. ॥१॥ तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेष धारण करणार्‍या सत्यनारायणप्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी “हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे, ते सांग” असा प्रश्न विचारला. ॥२॥ धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, “संन्यासीबुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? ॥३॥ आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे.” असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऎकून भगवान्म्हणाले, “तुझे बोलणे खरे होवो.” ॥४॥ असे बोलून संन्यासवेष धारण करणारे भगवान्तेथून गेले व तिथूनथोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले ॥५॥ संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. ॥६॥

नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्यावेळाने सावध होऊन चिंता करू लागला. ॥७॥ त्या वेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, “महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे ॥८॥ तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील.” ॥९॥ असे जावयाचे भाषण ऎकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. ॥१०॥ “महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा.” असे म्हणून पुन: पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दु:खी झाला. संन्यासवेषधारी भगवान्शोक करणार्‍या साधुवाण्याला म्हणाले, “शोक करू नकोस. ॥११॥ मी सांगतो ते ऎक. तू माझ्या पूजनाविषयी पराङमुख आहेस ॥१२॥ व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दु:ख प्राप्त झाले.” हे ऎकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. ॥१३॥ साधुवाणी म्हणाला, “तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाहीत. हे प्रभॊ, हे आश्चर्य आहे.” ॥१४॥

तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. ॥५॥ मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे.” असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऎकून भगवान संतुष्ट झाले; ॥१६॥ व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले; ॥१७॥ व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले, ॥१८॥ व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी आनंदझाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. ॥१९॥ नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, “ही पाहा माझी रत्‍नपुरीनगरी,” असे बोलून द्र्व्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. ॥२०॥ तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. ॥२१॥ तो म्हणाला, “बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत.” ॥२२॥ असे दूताचे वाक्य ऎकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला ‘सत्यनारायणाची पूजा कर’ असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. ॥२३॥

आईचे वाक्य ऎकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली, ॥२४॥ त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायणप्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्र्व्यासह पाण्यात बुडविली. ॥२५॥ त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हल होऊन ती रडत भूमीवर पडली.॥२६॥ बुडालेली नौका व त्यामुळे दु:खी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंत:करणाने साधुवाणी नावाड्यांसह हा काय चमत्कार, असे म्हणून विचार करू लागला. ॥२७॥ ॥२८॥ नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दु:खी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, ॥२९॥ “अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. ॥३०॥ नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दु:खी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. ॥३२॥ ॥३३॥

धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहिशी केली असेल कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. ॥३४॥ नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने, ‘माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन’ असे सर्वांना सांगितले. ॥३५॥ आणि सत्यनारायणाला पुन: पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, “हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणुन तिचा पती अदृश्य झाला. ॥३६॥ ॥३७॥ हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही.” ॥३८॥ आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. ॥४०॥ नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, “आता लवकर घरी चला, उशीर का करता?” ॥४१॥

मुलीचे हे वाक्य ऎकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले, ॥४२॥ व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायणप्रभूचे सत्य लोकात गेला. ॥४३॥ ॥४४॥ या ठीकाणी सत्यनारायणकथेतील चौथा अध्याय पुरा झाला. ॥४॥ हरये नम: ।

॥ इति चतुर्थोsध्याय: समाप्त: ॥

सूत सांगतात, “मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता. ॥१॥ त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदु:ख प्राप्त झाले, ते असे- तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत, असे राजाला दिसले. ॥२॥ ॥३॥ परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला; ॥४॥ व नंतर भक्तिभावाने सर्व गोपबांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदु:खी झाला. ॥५॥

त्या राजाचे शंभर मुलगे व धनधान्यादि सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले, ॥६॥ व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. ॥॥ नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. ॥८॥ त्यामुळे हा अंगध्वज राजा धन-पुत्र इत्यादी ऎश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठलोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. ॥९॥ जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो ॥१०॥ त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. ॥१०॥ जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऎश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो. ॥१२॥ ऋषीहो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. ॥१३॥

विशेषत्वेकरून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. ॥१३॥ ॥१४॥ नानारूपे धारण करुन सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान्कलियुगात सत्यनारायणव्रतरूपी होईल. ॥१५॥ मुनिश्रेष्ठहो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्रीसत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. ॥१६॥ या ठिकाणी श्रीसत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला.

॥हरये नम: हरये नम: हरये नम: ॥

॥इति पंचमोऽध्याय: समाप्त: ॥