प्रल्हाद-होलिका दहन
हिरण्यकश्यपू अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. अत्यंत विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले. तिला अग्नीपासून भय नव्हते. प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला. पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली. तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला. वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले.
रंग का उधळतात?
सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी? तेव्हा महादेवांनी वरदान देवून कामदेवाला जीवनदान दिले. व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. हा उत्सव पाच दिवस चालला. फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंग पंचमीला या उत्सवाची सांगता झाली. रंग पंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस. या दिवशी सर्व देव रंग खेळतात, असे समजले जाते. चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते. आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. तऱ्हेतऱ्हेचे फुलांचे रंग, गुलाल याने राधा-कृष्ण होळी खेळतात, असा समज आहे. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. हळूहळू ह्या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हटले जाते.
होळीची संपूर्ण कथा?
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.
राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.