चातुर्मासातील पहिल्या आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावास्या. कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. आज दीप अमावस्या असून, दीप अमावस्येची कथा जाणून घेऊया.
दीपपूजनाची आख्यायिका पुराणात सांगितली आहे. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला. उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की, रोज दिवे घासावेत, तेलवात करावी आणि स्वतः प्रज्ज्वलित करावे. खडीसाखरेने त्यांच्या ज्योति साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडीत झाला.
पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाट-माट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की, असे होण्याचे कारण काय? मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सूनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेणा पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. तिला दिवा पावला. जसा तिच्यावरील आळ टळला, तसा तुमच्या आमच्यावरील आळ टळो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण