महाराष्ट्राचे कुल दैवत तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक द्वाराला शहाजी राजांचे तर दुसऱ्या द्वाराला जिजाऊ मातेचे नाव दिलेले आहे. भवानी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला दगडाच्या पायऱ्या पाहायला मिळतात. या दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर भाविकांसाठी स्नान आणि हातपाय धुण्यासाठी गोमुख कुंड आहे. भवानी मातेचे स्नानासाठी जे कुंड मंदिरात आहे, त्याला कल्लोळ कुंड म्हटले जाते. कल्लोळ कुंडात देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ या कल्लोळ कुंडात एकत्र आले आहेत, असे सांगितले जाते. तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर आहे. तिथेच आदिमाया, अन्नपूर्णा देवी, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर, येमाई देवी इत्यादी मंदिर देखील आहेत. ही मंदिरे भवानी मंदिराची शोभा वाढवतात. तुळजाभवानी मंदिराच्या प्रसन्न आवारात भाविकांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. या आवारातूनच तुळजाभवानी मातेचे दर्शन भेटते. भवानी मातेच्या मुख्य मंदिराचे द्वार हे चांदीच्या पत्र्याचे असून त्यावर विलक्षण असे नक्षीकाम केलेले आहे. चांदीच्या दरवाजातून आत भवानी मातेची काळ्या पाषाणातील प्रसन्न अशी मन मोहून टाकणारी सुंदर, तेजस्वी मूर्ती आहे. जवळपास 3 फुटांची ही भवानी मातेची मूर्ती स्वयंभू आहे. सिंहासनावर असलेल्या भवानी मातेच्या मूर्तीवरील डोक्यावर असलेल्या मुकुट हा शोभणीय दिसतो, त्यातून केसाच्या बटा बाहेर आलेल्या दिसतात. भवानी मातेच्या मूर्तीला आठ हात असून, त्या हातात त्रिशुळ, बिचवा, बाण, चक्र, धनुष्य, शंख, पानपात्र, राक्षस शेंडी आहे. देवीच्या उजव्या व डाव्या बाजूला चंद्र आज सूर्य आहे. तर देवीच्या पायाखाली राक्षस असून त्यावर देवीने एक पाय दिलेला आहे.
तुळजापूरच्या भवानी मातेची मूर्ती ही चल मूर्ती असून ती वर्षातून 3 ते 4 वेळा गाभाऱ्यातून बाहेर काढली जाते.
दसऱ्यात देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. भवानी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळच नाही तर ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे.
तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, मंदिराच्या गुंतागुंतीच्या स्थापत्य वैभवाने भवानी मंदिर हे भाविक आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत करते. तुळजाभवानी मंदिर हे भवानी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय हिंदू धर्मात भवानी मंदिराला आदरणीय स्थान दिले जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले भवानी मंदिर हे भवानी मातेला समर्पित असलेले प्राचीन देवीचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथे आहे.
काय आहे इतिहास? History of temple
तुळजापूरच्या भवानी मंदिराचा इतिहास हा 900 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. यादव कालीन बांधलेल्या भवानी मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे भवानी देवीचे निस्सीम भक्त होते. तुळजाभवानी मातेवर भक्ती असलेले स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज हे नियमितपणे भवानी मातेच्या दर्शनाला येत असत. असे सांगितले जाते की तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन छत्रपती शिवरायांना भवानी नावाची तलवार दिली होती.
भवानी मंदिराचे ऐतिहासिक संदर्भ हे भारतीय कथा पुराणांत सापडते. तुळजाभवानी मंदिराचा सर्वात जुना शिलालेखा हा इसवी सन 1397 मध्ये तुळजापूर तालुक्यातील काटी येथे आढळून येतो. स्कंदपुराणात तुळजाभवानी देवीची कथा प्रसिद्ध आहे. कृत युगात कर्मदऋषी आपली पत्नी अनुभूती आणि मुलांसोबत राहत असत.
कर्मद ऋषींची पत्नी ही सुशील आणि सुशिक्षित होती. काही वर्षांनी कर्मद ऋषींचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी ही मंदाकिनी नदीच्या तीरावर तपचर्या करण्यासाठी बसली. तेव्हा तिच्यावर राक्षसांची दूरदृष्टी पडली. मंदाकिनीने आई भवानीला साद घालताच, तुळजाभवानी मातेने तिथे प्रगट होऊन गोकुळ नावाच्या राक्षसाचा वध केला होता; अशी कथा स्कंदपुराणात सांगितली जाते.
आपल्या भक्तांवर वाईट नजर टाकणाऱ्या गोकुळ राक्षसाचा आई तुळजाभवा मातेने वध केला तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा, तो दिवस पुढे विजयादशमी म्हणून प्रसिद्ध झाला. अश्विन शुद्ध दशमीच्या विजयानंतर अनुभूती यांनी भवानी मातेला विनंती केल्यानंतर तुळजाभवानी मातेने बालाघाट डोंगरावर म्हणजे यामुनाचल टेकडीवर लोकांच्या रक्षणासाठी अखंड वास्तव केले.
कथा Story –
महिषासुर नावाचा राक्षस हा सर्व देवतांना खूप त्रास देत होता, तेव्हा ब्रह्म विष्णू महेश यांनी या राक्षसाला संपवण्यासाठी प्रचंड अग्नी निर्माण केला त्या अग्नीतून भवानी माता साकार झाली, आणि महिषासुर या राक्षसा सोबत युद्ध केले. महिषासुर हा राक्षस वेगवेगळे रूप धारण करून तुळजाभवानी मातेशी युद्ध करत होता.
भवानी मातेने प्रथम महिषासुर राक्षसाचे संपूर्ण सैन्य संपवून टाकले आणि त्यानंतर प्रत्यक्ष महिषासुर राक्षसाची युद्ध केले. महिषासुराने सिंहाचे रूप धारण करून देखील भवानी माते सोबत युद्ध केले. त्यानंतर त्याने अर्धा मानव आणि अर्ध राक्षसाच्या रूपात देवीशी लढत असताना, भवानी मातेने आपल्या तलवारीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळेच भवानी मातेला महिषासुर मर्दिनी म्हटली जाते.
कशी आहे मंदिराची रचना? Temple Architecture
तुळजाभवानी मातेचे मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. भवानी मंदिराची वास्तू ही चालुक्य काळातील हेमाडपंथी शैलीची आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील उत्तम कलाकुसर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. तुळजापूर भागावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशाचे सांस्कृतिक एकत्रीकरण मंदिर पाहताना लक्षात येते.
भवानी मंदिराच्या परिसरात उत्कृष्ट कोरीवकाम, शिल्पे आणि सुंदर नक्षीकाम केलेली विविध दगडी खांब आहेत. तुळजाभवानी मंदिराचे भव्य असे दोन प्रवेशद्वार हे भारतीय स्थापत्य शास्त्राची आणि मंदिराची भव्यता सांगतात.
तुळजाभवानी मंदिरामधील नवरात्र उत्सव Navratri at Tuljabhavani temple
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या थाटामाटा मध्ये साजरा केला जातो. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील तुळजापूरला भवानी मातेच्या नवरात्र उत्सवामध्ये सामील होण्यासाठी भाविक भक्त पायी चालत पालख्या घेऊन येत असतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी सोन्याच्या पुतळ्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ नवरात्र उत्सवांमध्ये देवीच्या गळ्यात घातली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीच्या चरणी अर्पण केलेली ही माळ, देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक होय. प्रतिवर्षी तुळजाभवानी मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटा साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस तुळजाभवानी मातेची मनोभावी पूजा केली जाते.
तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना, छबिना, दररोज विविध प्रकारच्या पूजेचे आयोजन केले जाते. नवरात्र उत्सवातील विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक भक्त तुळजापूरला येत असतात.
तुळजाभवानी मातेचा छबिना Tuljabhavani Chabina –
तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती ही चांदीच्या मेघदंबरीमध्ये ठेवून, सोबत देवीच्या पादुका ठेवून त्याची तुळजाभवानी मंदिरा भोवती प्रदक्षिणा घातली जाते यालाच श्री तुळजाभवानी मातेचा छबिना म्हटले जाते. तुळजाभवानी मातेचा छबिना हा महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी तसेच पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेचा एक दिवस नंतर काढला जातो.
तुळजाभवानी मातेचा कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा छबिना हा दिवाळीच्या पाडव्या दिवशी काढून, फाल्गुन पौर्णिमेचा छबिना हा गुढीपाडव्याच्या दिवशी काढला जातो. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने तुळजापूरला तुळजाभवानी मंदिरात भवानी देवीचा छबिना पाहण्यासाठी येत असतात.
तुळजाभवानी मातेच्या निद्रा काळातील 21 दिवस छबिना काढला जात नाही. तुळजाभवानी मातेचे मंदिर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान समजले जाते. त्यामुळे तुळजाभवानी मातेचा छबिना हा तुळजापूर परिसरातील आशा ठिकाणी उभा राहतो, ज्या ठिकाणी तुळजापूर परिसरातील सर्व गावांच्या हद्दी एकत्र येतात.
त्या ठिकाणी मातेचा छबिना उभा राहून प्रत्यक्ष माता संपूर्ण जगाचे रक्षण करत असते. श्री भवानी मातेच्या छबिना उत्सवा दरम्यान छबिण्यासमोर पोत पाजळून भवानी मातेचा जयघोष केला जातो. भवानी मातेचे छबिना उत्सवातील संबळ हे मुख्य वाद्य आहे. संबळ वाजवून गोंधळी बांधव हे छबिना उत्सवा दरम्यान प्रसन्न, मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करून संपूर्ण तुळजापुरात भक्तीचा जागर घालतात.
तुळजापूरला कसे जायचे? How to reach the temple?
तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर हे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर या ठिकाणी आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर असलेले तुळजापूर हे ठिकाण सोलापूर पासून 44 किलोमीटर आणि धाराशिव पासून 22 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांपासून तुळजापुरला जाण्यासाठी नियमितपणे शासकीय बस तसेच खाजगी वाहन नेहमी उपलब्ध असतात.