कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरितालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाजते. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात. साज श्रृगांर करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिव पार्वतीची प्रतीमा ठेवतात. यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन किर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात.
हरतालिका कथा
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”