घृष्णेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जे महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील दौलताबादपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर आहे.
काय आहे घृष्णेश्वराचा इतिहास? History of Grishneshwar Temple
या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, सुधर्म नावाचा एक विद्वान ब्राह्मण त्याची पवित्र सुंदर पत्नी सुदेहा हिच्यासोबत देवपर्वतावर राहत होता. दोघेही शिवाचे परम भक्त होते. अनेक वर्षे होऊनही त्यांना मूलबाळ झाले नाही. शेवटी सुदेहाने पतीला विनंती करुन तिची बहीण घुश्मा हिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं. घुष्मा ही भगवान शिवाची निस्सीम भक्त होती आणि भगवान शिवाच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. सुदेहाने आपल्या बहिणीचा कोणत्याही प्रकारे मत्सर न करण्याचे वचन दिले होते पण तसे होऊ शकले नाही. काही वर्षांनी सुदेहाने घुष्माच्या झोपलेल्या मुलाची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या तलावात फेकून दिला. सकाळी घरात कोलाहल माजला होता, पण विचलित होऊनही घूष्माने शिवभक्ती सोडली नाही. नेहमी प्रमाणे ती त्याच तलावावर गेली. घूष्माने शंभर शिवलिंगे बनवून त्यांची पूजा केली आणि नंतर त्यांचे विसर्जन केले.
ष्माच्या भक्तीने शिव खूप प्रसन्न झाले. पूजा आटोपून ती घराकडे वळली असता तिला आपला मुलगा समोर उभा असल्याचे दिसले. शिव शंकराची ही लीला पाहून ती अवाक झाली. शिव तिच्यासमोर प्रकट झाले होते. आता शिव त्रिशूल घेऊन सुदेहाला मारायला गेले, तेव्हा घुष्माने भगवान शिवाला हात जोडून विनवणी केली आणि आपली बहीण सुदेहाच्या अपराधाची क्षमा करण्यास सांगितले. घुष्माने पुन्हा भगवान शंकरांना विनंती केली की, जर ते तिच्यावर प्रसन्न असतील तर त्यांनी तिथे वास करावा. भगवान शिवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात घुष्मेश नावाने तेथे स्थायिक झाले.
कशी आहे मंदिराची रचना? Temple Architecture
या मंदिराच्या भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. २४ दगडी खांबांवर सुंदर नक्षीकाम करून सभा मंडप तयार करण्यात आला आहे. मंदिराचे गर्भगृह १७*१७ फूट असून त्यामध्ये पूर्वाभिमुख शिवलिंग ठेवलेले आहे. सभामंडपात भव्य नंदिकेश्वराची स्थापना केली आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा थोडे कमी आहे. गाभार्याच्या उंबरठ्यावर आणि मंदिरात इतर ठिकाणी फुले, पाने, प्राणी, पक्षी आणि मानवाच्या अनेक अभिव्यक्ती कोरल्या आहेत.
मंदिराला भेट देण्याच्या वेळा कोणत्या? Time to visit temple
घृष्णेश्वर शिवमंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथील २१ गणेश पीठांपैकी एक ‘लक्षविनायक’ या नावाने प्रसिद्ध आहे. पुरातत्व आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे मंदिर अतिशय खास आहे. मंदिरात अभिषेक आणि महाभिषेक केला जातो. सोमवार, प्रदोष, शिवरात्री आणि इतर सणांना येथे मोठी यात्रा भरते. ज्यामध्ये शिवभक्तांपासून पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मंदिर दररोज सकाळी ५.३० ते रात्री ९.३० पर्यंत खुले असते. श्रावणात मंदिर पहाटे ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते. मुख्य त्रिकाल पूजा आणि आरती सकाळी ६ आणि ८ वाजता होते. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची पालखी जवळच्या शिवालय तीर्थ कुंडात नेली जाते.
घृष्णेश्वराला कसे पोहोचाल? How to reach temple
घृष्णेश्वर मंदिर औरंगाबादपासून ३५ किमी आणि मुंबईपासून ४२२ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून २५० किमी अंतरावर आहे. औरंगाबाद ते घृष्णेश्वर हा ४५ मिनिटांचा प्रवास अतिशय संस्मरणीय आहे. हा मार्ग घनदाट झाडे, उंच पर्वत आणि सुंदर एलोरा लेण्यांमधून जातो. घृष्णेश्वरला जाण्यासाठी तुम्ही औरंगाबाद आणि दौलताबाद येथून बस आणि टॅक्सी सुविधा घेऊ शकता. रेल्वेने प्रवास करायचा असेल तर औरंगाबाद हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. इथे उतरून तुम्ही टॅक्सी किंवा ऑटोने मंदिरात पोहोचू शकता.